ब्लॉग कसा करायचा?  

Posted by शैलेश पिंगळे

तुम्हीही अत्यंत सोप्या पद्धतीने ते तयार करू शकता. blogger.com चे उदाहरण देता येईल. अगदी मिनिटभरात स्वत:चा ब्लॉग सुरू करू शकता. त्यासाठी तुमचा मेल आयडी आधीपासून असायला हवा. इथे नवे मेल अकाऊंट ओपन करता येत नाही. साइट गूगलशी संबंधित असली तरी जीमेलचेच अकाऊंट वापरावे लागते असे नाही. हॉटमेल अथवा याहूचेही चालेल. सुरुवातीला हा आयडी दिला की त्याचा पासवर्ड टाइप करायचा.

पासवर्ड देऊन झाल्यावर तुम्हाला ब्लॉगवर कोणते नाव हवे आहे ते द्यावे लागते. तुम्ही अगदी वेगळे नावही देऊ शकता. ते नाव तुमच्या ब्लॉगवर दिसत राहील. नंतर वर्ड व्हेरिफिकेशन होते. साइटवर काही इंग्रजी अक्षरे दिसतात. तीच अक्षरे त्याच क्रमाने त्याखालील बॉक्समध्ये टाइप करा. मग रजिस्ट्रेशनचा पहिला टप्पा पूर्ण होतो. दुसऱ्या टप्प्यात या ब्लॉगला नाव द्यावे लागते. ते ठळकपणे ब्लॉगच्या वर दिसत राहील. नंतर ब्लॉगचा अॅड्रेस. तुमचा जसा ईमेल आयडी असतो, तसाच हाही ब्लॉग आयडी असतो. तो एकदा दिल्यावर बदलता येत नाही. वाटले तर दुसऱ्या नावाने तुम्ही दुसरा ब्लॉग सुरू करू शकता. त्यामुळे अत्यंत काळजीपूर्वक नाव द्या. हे नाव तुमचे स्वत:चे असू शकते तसेच दुसरे काहीही असू शकते. समजा तुम्हाला आयलव्हक्रिकेट असे नाव द्यायचे असेल तरी काही हरकत नाही. फक्त ते आधी इतर कोणीही घेतलेले नसावे. कोणी आधी घेतले असेल तर दुसरे नाव द्यावे लागते. ते देऊन झाले की तुमचा ब्लॉग आयडी तयार होतो. तो असा : आयलव्हक्रिकेट डॉट ब्लॉगस्पॉट डॉट कॉम. ब्राऊझरमध्ये तो आयडी टाइप केला की तात्काळ ही ‘डायरी’ ओपन होते. तिच्यात रोजच्या रोज लिखाण करू शकता. एखादे मूल घरात जन्माला आले असेल तर त्याच्या आयुष्याचा पहिल्या दिवसापासूनचा लेखाजोखा या डायरीत लिहिण्याची कल्पना कशी आहे? मोठे झाल्यावर त्या मुलाने वा मुलीने ते वाचल्यास मोठी गंमत वाटेल.

हे ब्लॉग फक्त मजकुराचेच असावेत असे बंधन नाही. एखादा फोटोग्राफर फोटोतून अधिक ‘बोलतो’. तो ते कदाचित शब्दांतून व्यक्त करू शकणार नाही. त्याचा ब्लॉग हा फोटोंचाच ब्लॉग असू शकतो. एखाद्याला चित्रकलेची आवड असेल तर तो स्वत:ची अथवा नामवंत चित्रकारांची चित्रे (अर्थात कॉपीराइटचा विचार करून) ब्लॉगवर टाकू शकतो. त्याला आर्टब्लॉग म्हणतात. फक्त व्हीडीओचीच देवाणघेवाण करायची असेल तर तसा ब्लॉग होतो. त्याला व्ह्लॅाग म्हणतात. तसाच म्युझिक ब्लॉग, स्केचब्लॉग होतो. काहीही असले तरी या सर्वांचा मूळ हेतू परस्परसंवाद असाच आहे.

तुमच्या मित्राचा ब्लॉग आयडी माहीत असेल तर तो टाइप करून पेज ओपन करा आणि त्यातील एंट्रीज वाचून तुमची कॉमेंट पोस्ट करा. मात्र तुम्ही निनावी कॉमेंट करू शकत नाही. तुमचा मेल अॅड्रेस व पासवर्ड द्यावाच लागतो. अन्यथा कोणीही कोणाचाही ब्लॉग ओपन करून काय वाट्टेल ते लिहित राहील. अर्थात ही पद्धतही फुलप्रूफ नाही. एखाद्या बोगस नावाने एखाद्याने ईमेल आयडी ओपन केला तर तुम्ही काय करणार? असो. ब्लॉगधारक जेव्हा ही ‘डायरी’ ओपन करील तेव्हा ही कॉमेंट दिसेल. ती वाचून तुम्ही नवीन एंट्री पोस्ट करू शकता. असेच हे चक्र चालू राहते.

हा ब्लॉग फक्त खासगीच हवा असे नाही. मित्रमैत्रिणींचा एखादा ग्रुप एकत्रितपणे एखादा ब्लॉग चालवू शकतात. कॉलेज लाइफ अथवा त्यानंतर आपापल्या मार्गाला लागल्यावरही एकत्रितपणे गप्पांचा अड्डा जमवू शकतात. प्रत्येकाने एकमेकांना ईमेल पाठविणे हा पर्याय आहेच. पण खुलेआम एकमेकांबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करणे आणि आयडियाज शेअर करणे यासारखा दुसरा आनंद नाही.

This entry was posted on Tuesday 18 November 2008 at 4:52:00 pm . You can follow any responses to this entry through the comments feed .

3 प्रतिक्रिया :

मित्रा ..
तुझा ब्लॉग झकास आहे. मी मधूनमधून तुझ्या ब्लॉगवर येत असतो. मी तुझा ब्लॉग माझ्या या पोस्टमधे जोडला आहे. "ब्लॉग" या विषयावर मी एक पोस्ट लिहीली आहे. तरी एकदा नजर टाकावी.

शुभेच्छा !

20 November 2008 at 22:38

तुमचा ब्लोग माहितीपू्र्ण आहे खुपच आवडला
Cellar Heat ही थिम कुथे मिळु शकेल "And now it is available for Blogger, especially for MagzNetwork readers" असे त्यांच्या ब्लोग वर म्हटले आहे . ती डाउन्लोड कशि करता येइल
धन्यवाद आणी शुभेछा
संजय जोशी

23 November 2008 at 13:08

me ek blog thyr kel pan too net var prakashit zala ki nahi te kase samjel plz sagaa

27 December 2013 at 22:13

Post a Comment

©2007-2008 शैलेश पिंगळे .सर्व हक्क सुरक्षीत.लेखकाच्या पुर्वपरवानगीशिवाय या ब्लॉगवरील लेख पुन:प्रसिद्ध करु नयेत.